Agneepath Scheme: केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेला देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत सैन्य भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्ष इतकी ठेवली आहे. याआधी ही वयोमर्यादा 21 वर्ष इतकी होती. गेल्या दोन वर्षांत एकही भरती झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे. 


गुरुवारी देशातील विविध भागांमध्ये अग्निपथ योजनेविरोधात मोठी आंदोलने झाली. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या. बिहारमधील नवादा जिल्ह्यात भाजप कार्यालयालाही आंदोलकांनी आग लावल्याची घटना समोर आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने अग्निपथ योजनेसाठीच्या पहिल्या भरतीसाठी वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने म्हटले की, मागील दोन वर्ष सैन्य भरती झाली नव्हती. त्यामुळे  वर्ष 2022 साठी अग्निपथ होणाऱ्या भरतीसाठी वयमोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


वयोमर्यादेबाबतही विरोध झाला


विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या विरोधात एक मुद्दा हा वयोमर्यादेबाबतही होता. सध्या कमाल वयोमर्यादा 21 वर्ष इतकी आहे. मात्र, विरोध पाहता कमाल वयोमर्यादा ही 23 वर्ष करण्यात आली आहे. 


सरकारकडून स्पष्टीकरण


अग्निपथ योजनेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही स्पष्टीकरणं दिली आहेत. अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवा समाप्तीनंतर व्यवसाय, शिक्षण आणि इतर नोकऱ्या इत्यादींसाठी सरकारकडून मदत दिली जाणार आहे. अग्निवीरला 11.72 लाख रुपयांच्या आर्थिक पॅकेज देण्यात येणार आहे. या निधीतून ते  काही व्यवसाय सुरू शकतात.