नवी दिल्ली : जवानांना श्रद्धांजली वाहताना संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यात चीनचा उल्लेखही का नाही, असा प्रश्न काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झालेत. या घटनेवर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या रुपानं तब्बल 36 तासानंतर पहिली सरकारी प्रतिक्रिया आली. त्यावर राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. राजनाथ सिंह यांनी जवानांना श्रद्धांजली वाहणारं जे ट्विट केलं आहे, त्यात चीनचा उल्लेखही नसणं हा जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जर खरोखर इतक्या वेदना झाल्या असतील तर अशी सुरुवात करुन राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात त्यांचा पुढचा प्रश्न आहे की जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन दिवस का लागले? जवान शहीद होत असतानाही राजकीय सभा का सुरु ठेवल्या जातायत?
15 आणि 16 जूनच्या रात्री भारत चीन सीमेवर दोन्ही देशाच्या जवानांमध्ये हिंसक झटापट झाली. त्यानंतर पुढचे दोन दिवस सरकारकडून कुठलीच माहिती दिली जात नसल्यानं राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह इतर विरोधकांनी टीका केली होती. सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी या सगळ्या मुद्द्यावर पंतप्रधान का गप्प आहेत, ते कुठे लपले आहेत? जे सीमेवर झालंय ते जाणून घेण्याचा देशाला अधिकार आहे, असं म्हणत टीका केली होती.
दरम्यान आज मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाची आढावा बैठक घेण्याआधी पंतप्रधानांनी चीनच्या मुदद्यावर आपलं मौन तोडलं. भारताला शांती हवी आहे, पण कुणी आमच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर चोख उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी चीनचं नाव न घेता दिला. शिवाय चीनच्या मुद्द्यावरच पंतप्रधानांनी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. या आधी 2016 मध्ये उरी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आणि 2019 मध्ये पुलवामा एअर स्ट्राईक केल्यानंतर झालेल्या घटनेची माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या दोनही बैठकांना पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित नव्हते. राजनाथ सिंह, सुषमा सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका झाल्या होत्या. यावेळी मात्र स्वत: पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतेय.
संबंधित बातम्या :