नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे. याच दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठींसाठी उद्धव ठाकरे देखील दिल्लीत आहेत.
सेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात महत्त्वाचं ठरलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता. आमदार अपात्रता प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयानं काही निकष देखील घालून दिले होते. राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. तर, जुलै 2023 मध्ये शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यावेळी देखील राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती. त्यामुळं सुनावणीत अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नोटिशीला उत्तर दिलं आहे का ते पाहावं लागणार आहे.
राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधातील याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर देखील सुनावणी कधी होणार याकडे सर्वंचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर
उद्या उद्धव ठाकरे दुपारी दिल्ली येथे पोहोचतील. ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. यामध्ये सोनिया गांधी, मलिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची देखील भेट उद्धव ठाकरे घेतील. तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा उद्धव ठाकरे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौरा करून इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यात असतील.
संबंधित बातम्या :