Rahul Gandhi :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) परवानगी न देण्याची भूमिका आसाम सरकारने घेतली असताना दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारचे आव्हान स्वीकारले आहे. मंगळवारी, सकाळच्या सुमारास झालेल्या पोलिसांसोबतच्या झटापटीनंतर राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, कन्हैय्याकुमार यांच्यासह काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 


आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर दाखल झाल्याची माहिती दिली आहे." काँग्रेसच्या सदस्यांनी हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरुद्ध कलम 120 (बी) 143/147/188/283/427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री बिस्वा यांनी दिली. त्याशिवाय पीडीपीपी कायद्यातील कलम 353 (लोकसेवकावर हल्ला), कलम 332 (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), आणि कलम 333 (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे) आदींसारखे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 






याआधी मंगळवारी (23 जानेवारी) राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बॅरिकेड्स तोडले. डीजीपींना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 


 मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांनी म्हटले की, “हिंसा ही आसामच्या संस्कृतीचा भाग नाही. आम्ही शांतताप्रिय राज्य आहोत. असे नक्षलवादी डावपेच आपल्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. तुमच्या बेजबाबदार वृत्तीमुळे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यामुळे गुवाहाटीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांनी म्हटले.


राहुल गांधींनी काय म्हटले?


काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आसामचे मुख्यमंत्री जे काही करत आहेत, त्याचा फायदा यात्रेचा होत आहे. जी प्रसिद्धी आम्हाला मिळत नाही, ती आम्हाला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री आसामचे मंत्री आणि कदाचित त्यांचे "गृहमंत्री अमित शहा आम्हाला मदत करत आहेत. आज आसाममध्ये आमची यात्रा हा मुख्य मुद्दा बनला आहे."