मुंबई: भारतातील प्रमुख उद्योगपती राहुल बजाज यांचे आज निधन झाले. राहुल बजाज यांना स्वातंत्र्यसैनिकाच्या घराण्याची पार्श्वभूमी होती. 'बजाज ग्रुप ऑफ कंपनीज'चे संस्थापक आणि स्वातंत्र्यसेनानी जमनालाला बजाज यांचे ते नातू होते. राहुल बजाज हे आयुष्यभर आपल्या आजोबांच्या तत्वांशी प्रामाणिक राहिले. 


स्वातंत्र्यसैनिकाच्या घरी जन्म
राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते.  


जमनालाल बजाज यांनी जवळपास दोन दशकं काँग्रेसची सेवा केली. इतिहासकार बिपीन चंद्रा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, जमनालाल बजाज हे भांडवलशाह, उद्योगपती असले तरी ते काँग्रेसशी जोडले गेले होते. 


जमनालाल बजाज यांनी एक उद्योगपती, स्वातंत्र्यसैनिक आणि एक समाजसुधारक अशी ओळख निर्माण केली. वर्धा येथे आश्रम स्थापन करावा असा सल्ला त्यांनी गांधीजींना दिला आणि त्यासाठी आपली 20 एकर जमीनही दान केली. महात्मा गांधींचा त्यांच्यावर एवढा प्रभाव होता की ब्रिटिशांनी त्यांना दिलेली राय बहाद्दूर ही पदवीही त्यांनी नाकारली आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. 


जमनालाल बजाज यांनी गांधीजींसोबत देशभरात फिरून सत्याग्रह आणि दांडी यात्रा यासारख्या अनेक आंदोलनांत भाग घेतला. त्यांना अनेकदा तुरुंगवास सोसावा लागला. जमनालाल बजाज हे आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध होते. 


बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. कमलनयन बजाज आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते. कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेलं होतं. राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेले.


राहुल बजाज यांचाही वर्ध्यातल्या महात्मा गांधींच्या आश्रमाशी भावनिक संबध होता. ते नेहमी या ठिकाणी भेट द्यायचे. 


महत्त्वाच्या बातम्या: