मुंबई: देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज निधन झालं आहे. त्यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उद्योजक राहूल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. वयोमान आणि त्याचवेळेस हृदयाचा आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजता त्यांच रुबी हॉल क्लिनिकमधे निधन झालं.
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना 2001 साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राहुल बजाज यांचा विवाह 1961 साली रुपा घोलप या महाराष्ट्रीय तरुणीसोबत झाला. या जोडप्यांना राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यानच्या काळात राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज बजाज कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला.
स्वातंत्र्यसैनिकाच्या घरी जन्म
राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे जवाहरलाल यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते. बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते. कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेलं होतं. राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेले. कमलनयन बजाज हे महात्मा गांधींच्या वर्ध्यातील संन्याशी आश्रमात वाढले.
राहुल बजाज यांचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित अशा कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळांमधून झाले. त्यांनी 1968 साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए (ऑनर्स ) हि पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करता करता बजाज इलेक्ट्रॉनिकस मध्ये उमेदवारी केली. 1964 साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली.
राहुल बजाज यांची कारकीर्द
- राहुल बजाज हे 1965 साली बजाज ग्रुपचे चेअरमन झाले.
- 2005 साली ते चेअरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक झाले.
- राहुल बजाज हे 2006 ते 2010 या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले.
- 2016 च्या फोर्ब्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज हे 722 व्या क्रमांकावर होते.