नवी दिल्ली : नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. नोटाबंदी आणि ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीतील त्रुटींचा मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. जीएसटी आणि नोटाबंदी लागू होण्यापूर्वी चार वर्षापर्यंत भारताच्या विकासदरांमध्ये वेगाने वाढ होत होती, असंही रघुराम राजन म्हणाले.
नोटाबंदी आणि जीएसटी या लागोपाठ दोन झटक्यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. त्यामळे जागतिक अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढत असतानाच भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचा दावा राजन यांनी केला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राजन यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. भारताच्या अनके महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पंतप्रधान कार्यालयाकडून हस्तक्षेप केला जातो, ही बाबदेखील एक समस्याच आहे. सध्याचा विकासदर सात टक्के आहे, मात्र देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने हा विकासदर पुरेसा नसल्याचं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं.
भारताचे भविष्य यावर बोलतांना रघूराजन म्हणाले की नोटबंदी आणि जीएसटी या दोन झटक्यानंतर देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. एकीकडे 2017 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ होत असताना, दुसराकडे भारतीय अर्थव्यवस्था घसरली असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत दुप्पट पटीने वाढत आहे. मात्र अर्थव्यवस्था वाढत असताना रोजगाराच्या संधी मात्र वाढत नसताना दिसत आहे. सध्या विकास दर कमी होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. लवकरात लवकर रोजगार निर्मीती करणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होणार असल्याचं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं.