पणजी : गोवा सरकारने आयात मासळीवर सहा महिन्यांकरिता पूर्ण बंदी घातली असून गरज पडल्यास पुढेही आणखी सहा महिन्यांनी बंदी काळ वाढविला जाणार आहे. या बंदीचा फटका गोव्यात मासळी निर्यात करणाऱ्या इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसणार आहे.


आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज ही घोषणा करताना सोमवारी खात्याचा आदेश जारी होईल, असे स्पष्ट केल्याने त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. फॉर्मेलिनबाबत गोवा सरकारने कडक भूमिका घेतल्यापासून सिंधुदुर्गची मासळी गोव्यात विकणे कठीण झाले असून त्यावरून राजकारण देखील रंगू लागले आहे.

फॉर्मेलिन वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. क्वालिटी इन्स्पेक्शनची कौन्सिलची प्रयोगशाळा गोव्यात स्थापन झाल्यावर तसेच आयात मासळी तपासण्याची पूर्ण व्यवस्था झाल्यानंतरच आयातबंदी उठविली जाईल. नंतर मासळीची तपासणी एफडीए करणार नाही तर आंतरराष्ट्रीय एजन्सीच तपासणी करणार आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले.

परराज्यातून गोव्यात मासळी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये एफडीएकडे नोंदणी तसेच इन्सुलेटेट वाहन सक्तीचे करण्यात आले होते. तशी मार्गदर्शक तत्त्वेही सरकारने जारी केली होती परंतु एकाही मासळी व्यापाऱ्याने अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नाही. काहींनी पळवाट शोधत आंतरराज्य बसगाड्यांमधून छुप्या पध्दतीने मासळी आयात सुरु केली आहे.

मडगाव नंतर आज पणजी मध्ये देखील तसा प्रकार उघड झाला आहे. आज मुंबईहून जीए-03-एन-5670 क्रमांकाच्या खाजगी लक्झरी बसमधून मासळीच्या पेट्या आणण्यात आल्या. मेरशी येथे या पेट्या उतरवण्यात आल्या. एफडीए अधिकाऱ्यांनी मासळीच्या पाच पेट्या जप्त केल्या तसेच जुने गोवे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ही बस कोलवाळ येथील मंदार अजित पार्सेकर यांच्या मालकीची असून मुंबई येथील प्रताप संपद मोरे नामक व्यक्तीने सावंतवाडी येथील डॉमनिक डिसोझा याच्यासाठी ही मासळी भरली होती व ती म्हापसा येथे उतरविण्यात येणार होती, अशी माहिती मिळाली आहे.

आंतरराज्य बसगाड्यांमधूनही मासळी आयात सुरु झाल्याने या विषयाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यापुढे आंतरराज्य बसगाड्यांचीही कडक तपासणी करण्यात येणार असून एफडीए, पोलिस अधिकारी बसमालक तसेच मासळी आणणाऱ्यांविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाई करतील, असे राणे यांनी स्पष्ट केले.

आयात मासळीमध्ये फॉर्मेलिन रसायन सापडल्याने जुलै महिन्यापासून राज्यात खळबळ उडाली होती. फॉर्मेलिनचे माणसाने सेवन केल्यास दुर्धर रोग जडण्याचा धोका असतो त्यामुळे मासळी खरेदी करताना आजही गोवकर धास्ती बाळगून आहेत. गोव्यात शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळमधून मोठ्या प्रमाणात मासळी आयात केली जात होती.