नवी दिल्ली : राफेल करारावरुन सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर केंद्र सरकारवर टीका होत आहे. यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय केंद्र सरकारसाठी दणका नसल्याचं त्या म्हणाल्या. तसंच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

"काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निकालाचा एक परिच्छेदही वाचला नसेल, हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पण राफेल प्रकरणी स्वत:ची मतं कोर्टाच्या नावाने खपवून राहुल गांधींनी कोर्टाचा अवमान केला," असा आरोप निर्मला सीतारमण यांनी केला आहे.

राहुल गांधींनी कोर्टाचा अवमान केला : सीतारमण
राहुल गांधींवर पलटवार करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "सुप्रीम कोर्टाने राफेल करारावर प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार आहोत. राहुल गांधींनी आज कोर्टाचा अवमान केला आहे. जो व्यक्ती स्वत: जामीनावर आहे, त्याला कोर्टाच्या निर्णयाने देशाला दिशाभूल करण्याचा अधिकार कोणी दिला? जे राहुल गांधी बोलले, ते कोर्टाने म्हटलेलंच नाही. संसदेत AA (अनिल अंबानी) बोलणारे आज RV (रॉबर्ट वाड्रा) सोबत आहेत. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कदाचित अर्धा परिच्छेदही वाचत नसतील. पण कोर्टाने याचिका स्वीकारली आहे आणि कोर्टानेही चौकीदार चोर है म्हटलं आहे, हा राहुल गांधींचा दावा कोर्टाच्या अवमाननेच्या श्रेणीत येतो."

राफेलच्या निर्णयावर राहुल गांधी काय म्हणाले?
अमेठी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. पण आज सुप्रीम कोर्टात सिद्ध झालं आहे की, चौकीदारनेच चोरी करायला लावली. काही ना काही भ्रष्टाचार झाला आहे हे कोर्टानेही मान्य केलं आहे. जर या प्रकरणाचा तपास झाला तर नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी ही दोन नावं समोर येतील."

राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?
राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी कोर्टात सादर केलेली गोपनीय कागदपत्रे वैध ठरवत सरकारला झटका दिला आहे. केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांवर घेतलेले सर्व आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत, गहाळ दस्तऐवज वैध ठरवत याची तपासणी केली जाणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं.

आज दिलेल्या निकालात सुप्रीम कोर्टाने सरकारचे आक्षेप फेटाळले आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता फेरविचार याचिकेवर जेव्हा सुनावणी होईल, तेव्हा या दस्तऐवजांमध्ये उल्लेख असलेल्या मुद्द्यांवरही चर्चा होईल आणि सरकारला त्यावरही स्पष्टीकरण द्यावं लागेल.