नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी तुरुंगाबाहेर पडण्याचे राष्ट्रीय जनता दलचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालू यांनी प्रकृतीचे कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत लालू यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
सीबीआयने कोर्टाला सांगितले की, आरोग्य ठिक नसल्याचे नाटक करुन लालू यादव रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमधून राजकीय कामं करत असतात. तिथे ते अनेक मोठ्या नेत्यांना तसेच प्रभावशाली व्यक्तींना भेटत असतात. ज्या आजारांचा संदर्भ लालू नेहमी देतात, ते आजार फार मोठे नाहीत. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु आहेत. या सर्व गोष्टी पुरवल्यानंतरही लालू आजारपणाचे ढोंग करत निवडणूक काळात तुरुंगाबाहेर राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे गेल्या 8 महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात राहण्यासाठी लालूंना विशेष सुविधा पुरवली जात आहे. शिवाय त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने लालूंचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
लालू यांना एकूण चार प्रकरणांमध्ये शिक्षा मिळाली आहे. त्यांना तब्बल 27 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा झाली असून त्यापैकी 20 महिन्यांची शिक्षा लालूंनी भोगली आहे. परंतु त्यापैकी बराच काळ त्यांनी आजारपणाच्या नावाखाली रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये घालवला आहे.
लालूप्रसाद हे सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे लालू यादव 1977 नंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहणार आहेत.
लालूंना प्रचारासाठी तुरुंगाबाहेर पडता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2019 05:21 PM (IST)
निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी तुरुंगाबाहेर पडण्याचे राष्ट्रीय जनता दलचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -