Anand Mahindra : भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबु प्रज्ञानंद (Rameshbabu Praggnanandhaa) याच्या बुद्धिबळातील यशस्वी कामगिरीला आनंदून महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्याला कार देण्याचं घोषित केलं होतं. त्यानंतर रमेशबाबु प्रज्ञानंदने आनंद महिंद्रा यांना ट्वीट करत त्यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, यावर आता आनंद महिंद्रा यांनी देखील प्रज्ञानंदच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. 


आनंद महिंद्रा यांच्या निर्णयानंतर रमेशबाबु प्रज्ञानंदने आनंद महिंद्रा यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार व्यक्त केले. तो म्हणाला, "कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत खूप खूप धन्यवाद सर. ईव्ही कार घेण्याचे माझ्या आई-वडिलांचे दीर्घकालीन स्वप्न आहे ते प्रत्यक्षात आणल्याबद्दल धन्यवाद! अशा शब्दांत त्याने आनंद महिंद्रा यांचे आभार मानले. 


आता यावर विशेष म्हणजे, आनंद महिंद्रा यांनीदेखील रमेशबाबु प्रज्ञानंदच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "कार निर्मात्याचे अंतिम ध्येय स्वप्नांना सत्यात बदलणे हे आहे," आनंद महिंद्रा यांनी रमेशबाबु प्रज्ञानंदच्या पोस्टला उत्तर दिले.


 






 


महिंद्रा ग्रुपकडून मिळणार आलिशान कार गिफ्ट


प्रज्ञानंदच्या धमाकेदार कामगिरीनंतर महिंद्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदच्या पालकांना आलिशान इलेक्ट्रानिक कार (EV) भेट देण्याची घोषणा केली. प्रज्ञानंद याला महिंद्रा ग्रुपकडून XUV 400 ईव्ही कार देण्यात येणार आहे. जागतिक दर्जावरील खेळांत देशाचं नाव उज्जवल करणाऱ्या खेळाडूंना महिंद्रा ग्रुप प्रोत्साहन देत आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन मॅग्नस कार्लसनविरोधातील धमाकेदार खेळात या इवल्याशा मुलाने उत्तम कामगिरी दाखवली, यासाठी प्रज्ञानंदला इलेक्ट्रॉनिक कार (EV) भेट देण्यात येत आहे.


रमेशबाबु प्रज्ञानंदने (Rameshbabu Praggnanandhaa) बुद्धिबळ विश्वचषकात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. जगातील नंबर 1 बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या सामन्यात प्रज्ञानंदने (Praggnanandhaa) चांगलीच लढत दिली. बुद्धिबळ विश्वचषकात 18 वर्षाच्या अवलियाने 32 वर्षांच्या कार्लसनला दिलेल्या जबरदस्त आव्हानामुळे जगभरातून प्रज्ञानंदचं कौतुक होत आहे. कार्लसनविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रज्ञानंदला पराभवाचा सामना पत्करावा लागला, तो चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर होता. जगपातळीवरील त्याच्या या अमूल्य कामगिरीवर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील प्रभावित होऊन त्यांनी प्रज्ञानंदच्या कुटुंबाला आलिशान कार भेट देण्याचा निर्णय घेतला होता.


महत्त्वाच्या बातम्या : 


R Praggnanandhaa: बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार आलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट; आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा