Punjab Election 2022: पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी विविध पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली असून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपसोबत जाण्याच्या तयारी केली आहे. या युतीत भाजप हा मोठ्या भावाच्या रुपात असेल तर कॅप्टन अमरिंदर सिंहांची पार्टी ही लहान भावाची भूमिका स्वीकारणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या संदर्भात शुक्रवारी पंजाब भाजप प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली आणि चर्चा केली. 


कॅप्टन अमरिंदर सिंह आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. त्यामध्ये पंजाब निवडणूक आणि त्यासंबंधीच्या रणनितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर या दोघांनी भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा केली.


पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह यांच्याबरोबरील वादानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 18 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आता या पक्षाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवणार आहेत.


सी व्होटर सर्व्हेमध्ये आपची बाजी
पंजाबमधील निवडणूक कोण जिंकेल? असा प्रश्न सी-व्होटरचा सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आला होता. यामध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाला 27 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 29 टक्के लोकांनी आप या पक्षाला निवडलं आहे. दहा टक्के लोकांना अकाली दल या पक्षाने सरकार बनवावे असं वाटतेय. भाजपला फक्त एक टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 25 टक्केंनी सर्व्हेत काहीही म्हटलेलं नाही. मुख्यमंत्रिपदासाठी लोकांनी चरणजीत चन्नी यांना पहिली पसंती दर्शवल्याचं सर्व्हेमधून समोर आलेय. तर केजरीवाल यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. 
 
पंजाबमध्ये कुणाची सत्ता?
आप -      29%
काँग्रेस -    27%
अकाली दल  - 10%
भाजप      -     1%
अन्य     -      1%
त्रिशंकु       -    7%
सांगू शकत नाही    - 25%


उत्तर प्रदेश आणि पंजाबसोबत पाच राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे.  


संबंधित बातम्या :