नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपण्याची अद्याप चिन्हं दिसत नाहीत. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हायकमांडकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. सिद्धू यांचा हा तकडाफडकी निर्णय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना रुचला नसून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी चर्चा सुरु होती. पण हायकमांडने अद्याप सिद्धूंचा राजीनामा स्वीकारला नसून त्याबाबत सस्पेन्स कायम ठेवलं आहे. या मुद्द्यावर काँग्रेस हायकमांड सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत आहे. 


दोन दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर हा कलह मिटेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण अद्याप तरी या मुद्द्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. 


सिद्धू का नाराज आहेत? 
पंजाबमध्ये मंत्र्यांची नावे ठरवताना सिद्धूंना हायकमांडने सहभागी करुन घेतलं नसल्याचं सांगण्यात येतंय. खातेवाटपाच्या वेळीही त्यांना विचारलं गेलं नाही आणि राज्यातील काही मुख्य पदांच्या निवडी करताना सिद्धू यांच्याशी कोणतीही सल्लामसलत करण्यात आली नाही अशी माहिती आहे.  अशा स्थितीत पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपली नाराजी हायकमांडसमोर व्यक्त केली आहे. पंजाबमध्ये मंत्र्यांची नावे ठरवली गेली, तेव्हा राहुल गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा करुन ठरवली होती.


कपिल सिब्बल यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा
आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे हे असे निर्णय कोण घेतंय याची आपल्याला कल्पना नसल्याचं सांगत कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कॉँग्रेसने लवकरात लवकर वर्किंग कमिटीची बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांनीही तशी मागणी केली आहे. 


संबंधित बातम्या :