श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी एक डझनहून अधिक संशयितांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुलवामा हल्ल्याच्या योजनेशी संबध असल्याच्या संशयातून काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. पुलवामा आणि अवंतीपुरा येथून या संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
स्फोटकांना भरलेल्या एका वाहनाने सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडक दिली आणि त्यानंतर स्फोट झाला. दहशतवाद्यांनी अशा प्रकारचा हल्ला याआधी केला नव्हता. पाकिस्तानातील एक नागरिक कामरानने या हल्ल्याची योजना आखल्याचं बोललं जात आहे. हा कामरान जैश-ए-मोहम्मदचा सदस्य असल्याचं बोललं जात आहे. कामरान दक्षिण काश्मीरच्या पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल परिसरात सक्रिय आहे.
दहशतवादी आदिल अहमदने हा आत्मघाती केल्याचं समोर येत आहे. 2018 मध्ये आदिल जैश ए मोहम्मदमध्ये सहभागी झाला होता. आदिल दक्षिण काश्मीरच्या गुंडीबाग काकपोरा पुलवामा परिसरातील रहिवाशी आहे. हल्ला झालेल्या ठिकाणाहून हा परिसर 10 किमी अंतरावर आहे. आदिलचा सुरक्षा यंत्रणांच्या दहशतवाद्यांच्या यादीतही समावेश होता. त्याच्यावर तीन लाखांचं बक्षिसही होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.
पाकिस्तानात सहा महिन्यांपूर्वी जैश ए मोहम्मदच्या कार्यालयात पुलवामा हल्ल्याची योजना आखल्याचं समोर येत आहे. या योजनेत मसूद अजहर, राशिद गाजी आणि आदिल यांचा समावेश होता. हल्ल्याबाबत काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनाही या हल्ल्याबाबत माहिती नव्हती.
14 फेब्रुवारी (गुरुवारी) हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
व्हिडीओ