नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "काँग्रेस पक्ष शहीद जवानांचे कुटुंबीय, सुरक्षा दल आणि सरकारसोबत आहे. पुलवाम्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला हल्ला हा हिंदूस्तानच्या आत्म्यावरचा हल्ला आहे." या पत्रकार परिषदेला राहुल यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद उपस्थित होते.


राहुल गांधी म्हणाले की, "पुलवाम्यात झालेला हल्ला हा देशाच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. ही वेळ राजकारण करत बसण्याची नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत आहोत."

राहुल म्हणाले की, "आतंकवादी संघटना या देशाला तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु जगातली कोणतीही ताकद या देशाचे विभाजन करु शकत नाही. या हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकार जी काही कारवाई करेल, हल्लेखोरांना जी काही शिक्षा देईल, आम्ही त्यांच्यासोबत आहोत."