Assembly Election 2022 : यावर्षी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेसने देखील तयारीला लागली आहे. यामध्ये प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ) या महत्वाची भूमिका बजावणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय सचिव देण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यामध्ये विशेष बाब अशी समोर आली आहे की या सचिवांपैकी एक तृतीयांश सचिव हे प्रियांका गांधी यांच्या टीमचे असणार आहेत.


राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. ही निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने प्रियांका गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतल्याची माहिती सूत्रांनी म्हणणे आहे. शनिवारी झालेल्या एआयसीसीच्या बैठकीत पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय सचिव नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.


या बैठकीत उपस्थित झालेल्या राष्ट्रीय सचिवांची नावे 


बैठकीत उपस्थित असलेल्या सचिवांमध्ये दीपिका पांडे, चंदन यादव, राजेश तिवारी, रोहित चौधरी, धीरज गुर्जर, प्रदीप नरवाल, विकास उपाध्याय, विजय सिंगला आणि चेतन चौहान यांचा समावेश होता.  या सर्व राष्ट्रीय सचिवांना आठवडाभरात कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरानंतर या सचिवांना पक्षाच्या वतीने हे काम देण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि प्रभारी राजीव शुक्ला यांनी काँग्रेस मुख्यालयातील बैठकीला हजेरी लावली, त्यांनी देखील आवश्यक त्या सूचना या बैठकीत दिल्या आहेत.



यूपी निवडणुकीत काम केलेल्या 4 नेत्यांना हिमाचलमध्येही जबाबदारी मिळणार


उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींसोबत काम केलेल्या चार नेत्यांना देखील हिमाचल प्रदेशमध्ये जबाबादारी मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यावरुन प्रियांका गांधींनी हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच, काँग्रेस नेतृत्वाने राज्य संघटनेत फेरबदल करुन माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे.


पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला दणका दिला


गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला होता. येथे मंडी लोकसभेसह विधानसभेच्या 3 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. आता पोटनिवडणुकीनंतर काँग्रेस विजयाची ही मालिका कायम ठेवू शकते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या या लढाईत आम आदमी पार्टीनेही उडी घेतली असून अरविंद केजरीवाल राज्याचा दौरा करत आहेत. हिमाचलला लागून असलेल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केले आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.