Clean air for all : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तरुणांनी सक्रीय व्हावं. तसेच शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करावा. समाजात बदल घडवून आणण्यासाठी योग्य वागणूक व दृष्टीकोन बाळगत  समाजातल्या परिवर्तनाचे दूत व्हावं असे आवाहन केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी केलं. 'स्वच्छ हवा सर्वांसाठी'  (Clean air for all ) या अभियानात लोकांना सहभागी करुन घेण्याची वेळ आली असल्याचे भूपेंद्र यादव म्हणाले. 


चेन्नईमध्ये 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम' आणि 'एक्सव्ही एफ.सी. मिलिअन प्लस सिटीज् चॅलेंज' अर्थात 15 व्या वित्त आयोगाच्या शहरांतील आव्हानांसंदर्भात असलेल्या विशेष निधी योजनेंतर्गत आढावा कार्यशाळेच्या उद्घाटन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. दक्षिण भारतासाठीच्या  या विशेष निधी योजनेत तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, केरळ, अंदमान व निकोबार, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, दमण व दीव आणि दादरा व नगर हवेली यांचा समावेश आहे.


नियोजित ध्येय गाठण्यासाठी लोकसहभागाची जोड 


आचा 'स्वच्छ हवा सर्वांसाठी' या अभियानात लोकांना सहभागी करुन घेण्याची वेळ आलेली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नांमुळे देशभरातील शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम  दिसून येऊ लागले आहेत. मात्र, आपले नियोजित ध्येय गाठण्यासाठी या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड दिली पाहिजे, असे भूपेंद्र यादव म्हणाले. भारतीय वाहने आणि इंधनासाठी बी.एस.- VI  मानक लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय हा हवेच्या प्रदुषणावर मात करण्याच्या दृष्टीने उचललेले अजून एक क्रांतिकारक पाऊल असल्याचे यादव यांनी सांगितले.


समन्वय, सहकार्य, सहभाग महत्वाचा


समग्र दृष्टीकोन अंगीकारत देशातील जवळपास 100 शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारत जनतेसाठी स्वच्छ हवेप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार यादव यांनी यावेळी केला. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तरुणांनी सक्रीय व्हावे, शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करावा, समाजात बदल घडवून आणण्यासाठी योग्य वागणूक व दृष्टीकोन बाळगत  समाजातल्या परिवर्तनाचे दूत व्हावे असे आवाहन पर्यावरण मंत्र्यांनी केलं. समन्वय, सहकार्य, सहभाग आणि सर्व भागीदारांचे निरंतर प्रयत्न या घटकांच्या आधारे 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा' ची उद्दीष्टे गाठता येतील. तसेच देशातील हवेच्या प्रदुषणाच्या समस्येवर परिणामकारक उपाययोजना करणे शक्य होईल, असा विश्वास यादव यांनी यावेळी व्यक्त केला.