नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 6 च्या सुमारास दिल्लीतील एम्स रूग्णालयात पोहचले. तिथे त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. देशभरात आजपासून कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षापुढील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे आणि 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय 71 वर्षे आहे.


दिल्लीतील एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची Co Vaxin पहिला डोस सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी लस घेतली. पुदुच्चेरी येथे राहणाऱ्या सिस्टर पी निवेदा यांनी ही लस दिली. या वेळी पंतप्रधानांनी गळ्याभोवती आसामी गमछा गुंडाळला होता. कोणत्याही सुरक्षेशिवाय ते एम्सला पोहचले.





कोरोना लस 250 रुपयात मिळणार


सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस मोफत मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. सरकारने त्याची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 रूपये लागतील.