नवी दिल्ली :  संपूर्ण देशभरात मंगळवार (24 ऑक्टोबर) दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजधानी दिल्लीमधील द्वारका येथील सेक्टर 10 मध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पूजा केली. त्यानंतर या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. 


यावेळी देशभरातील जनतेला संबोधित केले असून त्यांनी सर्वप्रथम देशवासीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. बोलताना त्यांनी म्हटलं की, श्रीरामाच्या जन्मभूमीवर उभारण्यात येणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर  आम्हा भारतीयांच्या संयमाच्या विजयाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.






राम मंदिर लवकरच उभे केले जाणार - पंतप्रधान मोदी 


पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'राम मंदिर पूर्ण होण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. लवकरच या मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. आज आपण भाग्यवान आहोत की आपण प्रभू रामाचे सर्वात भव्य मंदिर बांधताना पाहत आहोत. पण पुढील वर्षी रामनवमीच्या दिवशी रामलल्लाचा जयघोष या मंदिरात होईल.' 


'अंहकारावर विनम्रतेचा विजय'


पंतप्रधान म्हणाले, "विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा, अहंकारावर नम्रतेचा विजय आणि क्रोधावर संयमाचा विजय मिळवण्याचा सण आहे. पण भारतात शस्रांची पूजा ही अधिपत्यासाठी नाही तर रक्षणासाठी केली जाते', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


चंद्राच्या यशस्वी मोहीमेला दोन महिने पूर्ण - पंतप्रधान मोदी


गीताचे ज्ञान आणि आयएनएस विक्रांत आणि तेजसचे बांधकामाविषयी देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. आम्हाला श्रीरामाचे मोठेपण माहित आहे आणि आमच्या सीमांचे रक्षण कसे करावे हे देखील माहित आहे. चांद्रयान-3 बाबत पंतप्रधान म्हणाले, "यावेळी आम्ही विजयादशमी अशा वेळी साजरी करत आहोत, जेव्हा चंद्रावरील विजयाला 2 महिने पूर्ण झाले आहेत."


'जातीवादच्या नावावर फूट पाडणाऱ्यांचा भस्मासूर झाला पाहिजे' 


'आजच्या रावण दहनाच्या दिवशी केवळ पुतळेच दहन होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. समाजातील परस्पर सौहार्द बिघडवणाऱ्या प्रत्येक विकृतीचे दहन व्हायला हवे. ज आपण समाजातील दुष्कृत्ये आणि भेदभाव नष्ट करण्याची शपथ घेतली पाहिजे.जे जातीवाद आणि प्रादेशिकतेच्या नावाखाली भारतामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विजयादशमी हा सण केवळ रामाच्या रावणावरच्या विजयाचा सण नसावा, तर राष्ट्राच्या प्रत्येक दुष्कृत्यावर देशभक्तीच्या विजयाचा सण असावा', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


हेही वाचा : 


Indian Army Dasara 2023 : भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी