नवी दिल्ली : देशात केंद्र सरकारने ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळली आहे त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कौतुक केलं आहे. जगातल्या अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताने कोरोना परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 'ओपन' (Open) नावाच्या एका मॅगझिनला त्यांनी दीर्घ मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं.  


देशातला प्रत्येक युवक आत्मनिर्भर बनला पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, "देशातल्या प्रत्येक तरुणाला रोजगाराची संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आपले सरकार तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असून त्या दिशेने भरीव कामगिरी केली जात आहे. तरुणांनी आत्मनिर्भर व्हावं, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्यात आणि एक सन्मानाचं जीवन जगावं यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे."


भारताने कोरोना स्थिती चांगली हाताळली
कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आलं आहे. भारताने त्याच्या बरोबरीचे देश आणि इतर काही विकसित देशांच्या तुलनेत कोरोनाच्या संकटाचा सामना अत्यंत चांगल्या प्रकारे केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत लसीच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्याने आजचं हे यश दिसतंय असंही ते म्हणाले.


आपल्यावरील टीकाकार अल्प
आपण आपल्या आयुष्यात टीकाकारांना खूप महत्व देतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पण दुर्दैवाने आजकाल टीकाकारांची संख्या ही अत्यंत अल्प झाल्याचं ते म्हणाले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "अलिकडे लोक केवळ आरोप करतात, त्यांची संख्या मोठी आहे. एखाद्यावर टीका करायची असेल तर त्यासंबंधी अभ्यास, संशोधन करणे आवश्यक आहे. यासाठी लोकांकडे वेळच उरला नसल्याने आपल्यावर टीका करणारे लोक खूप कमी आहेत."


माझं सरकार राष्ट्रबांधणीचं काम करतंय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीच्या सरकारांवर टीका केली. ते म्हणाले की, "या आधीच्या सरकारातील लोकांनी केवळ पुढच्या टर्मच्या सरकाराची निर्मिती करण्यासाठी काम केलं. आपलं हे एकमेव सरकार आहे जे राष्ट्रबांधणीचं काम करतंय." 


महत्वाच्या बातम्या :