नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून यामध्ये संसदेतील 99.18 टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती चिफ रिटर्निंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर राज्यातील 283 आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे तर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.
राष्ट्रपती पदासाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपलं. या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मतदान केलं. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 4800 खासदार आणि आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.
राष्ट्रपती निवडणुकीमध्ये किती झालं मतदान
देशभरातल्या 4025 आमदारांपैकी 3991 आमदारांनी आणि तर 771 खासदारांपैकी 763 खासदारांनी मतदान केलं. ही मतदानाची टक्केवारी एकूण 99.12 टक्के इतकी आहे.
संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांच्या बैठक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मतदान केलं.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संध्याकाळी चार वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तृणमूल काँग्रेसने विरोधकांचे उमेदवार यशवंत सिंन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे.
काँग्रेस आमदार राहुल गांधी यांनी पावणे चार वाजता संसदेमध्ये आपल्या मदतानाचा अधिकार बजावला. तसेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरूर यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.
क्रॉस मतदान; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीएला मतदान
राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे शहजील इस्लाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार एस. जडेजा, ओदिशामध्ये काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम यांनी मुर्मू यांना मतदान केले.
राज्यातील 283 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला
राष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यातील एकूण 283 आमदारांना मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदान न केलेले आमदार
- नवाब मलिक
- अनिल देशमुख
- महेंद्र दळवी
- रमेश लटके (निधन)
- लक्ष्मण जगताप
असं आहे मतांचं गणित
- राष्ट्रपती निवडणुकीत एकूण 4809 मतदार, मतांचं एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431
- लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार मतदार, खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 200
- सर्व राज्यांतील 4033 आमदार मतदार, प्रत्येक राज्यात मतांचं मूल्य वेगवेगळं
- विविध राज्यांतील आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 231
- सध्याचं चित्र पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड