Maharashtra Bus Accident : मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघातातील मृतांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी केंद्र सरकारकडून दोन लाख रुपये आणि मध्य प्रदेश सरकारकडून चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा नदीच्या पुलावर झालेल्या अपघाताच्या घटनेवर दु:ख  व्यक्त केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याशिवाय, या अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 






मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीदेखील अपघाताच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दूरध्वनीवरून बोलणं झालं असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांना घटनास्थळी सुरू असलेल्या  मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आज झालेल्या अपघातातील शोकाकुल कुटुंबीयांसोबत मी आणि मध्यप्रदेश उभे आहोत असे त्यांनी म्हटले. मध्य प्रदेश सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केली. 






 


मुख्यमंत्री शिंदे यांचे एसटी महामंडळाला निर्देश


मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत.