Presidential Election 2022 : झारखंडच्या माजी राज्यपाल आणि एनडीएच्या (NDA) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज दुपारी 12 वाजता संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पीएम मोदी (PM Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह एनडीएचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.


राष्ट्रपतीपदाची उमेदवारी म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नामनिर्देशन पत्रावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी स्वाक्षरी करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जातील पहिले प्रस्तावक ठरले आहेत. त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "हे माझं भाग्य आहे की, भारतातील आदिवासी समाजातील पहिल्या आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी मला मिळाली."


YSRCP  चं मुर्मू यांना समर्थन 


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते स्वत: उपस्थित राहणार नाहीत. तर त्यांच्या जागी पक्षाचे राज्यसभा खासदार विजय साई रेड्डी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते मिधुन रेड्डी हे उपस्थित राहणार आहेत. 


कोण आहेत द्रोपदी मुर्मू? 


एनडीएचे उमेदवार मुर्मू यांचा जन्म  20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेविका म्हणून केली. नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. 2013 मध्ये त्या पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर पोहोचल्या. तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात 2000-2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह 6 ऑगस्ट 2002 ते मे पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. 


द्रौपदी मुर्मू या 2000 आणि 2004 मध्ये ओडिशाच्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे 2015 मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत. तसेच राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या आहेत. दरम्यान, निवडून आल्यानंतर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. याशिवाय त्या ओडिशातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपतीही असतील. राजकारण आणि समाजसेवेत त्यांनी जवळपास दोन दशके काम केलं आहे.