Narendra Singh Tomar on Fertilisers : कृषी क्षेत्रात होणारा खते आणि कीटकनाशक यांचा वापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्रानं सरकारला सहयोग द्यायला हवा असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar)यांनी व्यक्त केलं. फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या 11 व्या कृषीरासायनिक परिषदेला संबोधित करताना नरेंद्र सिंह तोमर बोलत होते. आपला देश शेतीवर आधारित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान फार मोठं आहे असल्याचं तोमर यांनी यावेली सांगितलं.


10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना उभरण्याचं काम सुरु


आपल्या देशामध्ये आता फलोत्पादन क्षेत्राला देखील प्रोत्साहन द्यायला हवं, जेणेकरुन आपण सर्व दृष्टीनं आत्मनिर्भर होऊ शकू असेही तोमर यावेळी म्हणाले. आपला देश आता अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत सुस्थितीत आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीनं आपल्याला शेतीच्या बाबतीत अधिक विकसित राष्ट्रांकडे पाहून नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. त्यांच्यासोबतच पुढे जावं लागेल. देशात सध्या 10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना उभारल्या जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा मोठा लाभ होत आहे. भविष्यातही त्या अधिक लाभदायक ठरतील. पिकांमध्ये वैविध्य आणण्याला देखील प्रोत्साहन दिलं गेले पाहिजे  असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं.


कृषी विकासासाठी एकत्र येऊन काम करावं 


कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरत आहेत, फिक्कीसारख्या औद्योगिक संस्थांनी कृषी विकासासाठी एकत्र येऊन काम करावं असे आवाहन देखील नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं. केंद्रीय रसायने आणि खते तसेच नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कीटकनाशकांच्या वापराबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर जनजागृती चालू आहे. सध्या मोठ्या प्रमाणवर वाढत चालेला रासायनिक खतांचा वापर आणि घटत चाललेली अन्न धान्याची गुणवत्ता, माणसाच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे वाईट  परिणाम या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रासायनिक खतांचा अतिवापर धोकादायक आहे. त्यामुळं रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम या विषयाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे.


महत्वाच्या बातम्या: