नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार आहे. एनडीएतर्फे रामनाथ कोविंद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर यूपीएकडून मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


20 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

मतांची आकडेवारी काय सांगते?

एनडीएकडे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी सध्या 5 लाख 32 हजार मतं आहेत. ओडिशातील सत्ताधारी पक्ष बीजेडीनेही रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. बीजेडीकडे 37 हजार 257 मतं आहेत.

एनडीएला दक्षिणेकडील दोन प्रमुख पक्ष वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसनेही पाठिंबा दिला आहे. तर नितीश कुमार यांची 20 हजार 779 मतंही एनडीएच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एनडीएकडे एकूण 6 लाख 29 हजार 658 मतं आहेत. तर निवडणूक जिंकण्यासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज आहे. म्हणजेच एनडीएकडे बहुमतापेक्षाही जास्त मतं आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतं फुटू नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची रविवारी बैठक पार पडली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंसह नेते उपस्थित होते.

कोण आहेत रामनाथ कोविंद?

  • रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.

  • कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण

  • 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.

  • 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती

  • भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं

  • भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष

  • 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत


कोण आहेत मीरा कुमार ?

मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू

माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.

1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी

1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या

1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी

2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे

2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.