Padma Awards Awards 2022: राजधानी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यादरम्यान त्या सर्व लोकांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, ज्यांच्या नावांची घोषणा काही आठवड्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यात हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावाचाही समावेश आहे.


काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलाय. रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांना हा पुरस्कार प्रदान केलाय. त्यांच्याशिवाय रामनाथ कोविंद यांनी पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेते देवेंद्र झाझरिया यांना पद्मभूषण देऊन गौरविले. दुसरीकडे, एसआयआयचे एमडी सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये 4 जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याचे सांगण्यात आलं होतं. या चार लोकांमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, भाजप नेते कल्याण सिंह, गीता प्रेस गोरखपूरचे अध्यक्ष राधेश्याम खेमका आणि शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रभा अत्रे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. याशिवाय एकूण 124 जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. आता या सर्वांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे. यात एकूण 34 महिलांचा समावेश आहे. या यादीमध्ये परदेशी/ एनआरआय/ पीआयओ/ ओसीआय या श्रेणीतील 10 व्यक्ती आहेत आणि 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे.


पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा /कार्यक्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. 'पद्मविभूषण' हा पुरस्कार  उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो.  उच्च श्रेणीतील अतुलनीय  सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय  सेवेसाठी ‘पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha