नवी दिल्ली :- सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची निवड राज्यसभेवर करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य केटीएस तुलसी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागी गोगोई यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं नाव नामनिर्देशित केलं. याबाबत आजच एक अधिसूचना जारी करण्यात आली.

अधिसूचनेत म्हटलं आहे की, 'भारतीय संविधानाच्या कलम 80 तील खंड (3) सह पठित खंड (1) चा उपखंड (क) द्वारे प्रदत्त नियमानुसार राष्ट्रपती यांच्या द्वारे एका रिक्त जागेवर राज्यसभेसाठी श्री रंजन गोगोई यांना नामनिर्देशित करत आहोत'.


रंजन गोगोई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश होते. 3 ऑक्टोबर 2018 रोजी सरन्यायाधीश झालेल्या गोगोई यांचा कार्यकाळ जवळपास 13 महिन्यांचा होता. त्यांनी मागील वर्षी 9 नोव्हेंबर रोजी राम मंदिर संदर्भात ऐतिहासिक निकाल दिला होता. गोगोई यांनी शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश आणि राफेल विमान सौदेबाजी संबंधी खटल्याच्या खंडपीठाचे देखील नेतृत्व केलं आहे.

कोण आहेत गोगोई
रंजन गोगोई हे मूळ आसामचे. आसामचे मुख्यमंत्री राहिलेले केशवंचन्द्र गोगोई यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी 1978 साली वकिली सुरू केली. 2001 मध्ये गुवाहाटी हायकोर्टाचे न्यायाधीश बनले. 2011 मध्ये पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले तर 23 एप्रिल 2012 ला ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. अत्यंत कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक न्यायाधीश अशी त्यांची छबी राहिली आहे.