नवी दिल्ली: मूळचे भारतीय पण सध्या परदेशात राहत असलेल्या नागरिकांचे देशाच्या विकासात योगदानाचे महत्व लक्षात घेऊन तसेच त्यांची मातृभूमीशी नाळ कायमची जोडली जावी या उद्देशाने भारतात 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उल्लेखनीय काम केलेल्या अनिवासी भारतीयांना प्रतिष्ठेचा 'प्रवासी भारतीय पुरस्कार' देण्यात येतो. अनिवासी भारतीयांच्या संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रवासी भारतीय दिनाचे हे व्यासपीठ महत्वाचे आहे.
गांधीजींचं भारतात आगमन
मोहनदास करमचंद गांधी हे 1883 सालाच्या सुमारास एका खटल्यासंबंधी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला आणि कृष्णवर्णीयांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. त्यानंतर 9 जानेवारी 1915 साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
भारतातील या सर्वात मोठ्या प्रवाशाच्या आगमनानिमित्त 2003 सालापासून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जायचा पण 2015 सालापासून प्रत्येक दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जातोय.
कोण आहेत प्रवासी भारतीय?
मूळचे भारतीय वंशाचे पण सध्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या नागरिकांना प्रवासी भारतीय म्हटलं जातं. सरकारच्या एका अहवालाच्या मते, जगभरातील 110 देशांमध्ये जवळपास अडीच कोटी मूळ भारतीय वंशाचे नागरिक वास्तव करत आहेत. या लोकांनी विदेशात राहूनही आपल्या देशाची संस्कृती, भाषा, वारसा अशा अनेक गोष्टींची जपणूक केली आहे. या नागरिकांमुळेच जगभरात भारताला एक वेगळी ओळख मिळतेय.
देशाच्या विकासात योगदान जगभरात राहणाऱ्या प्रवासी भारतीयांचे भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. जागतिक बँकेचा मायग्रेशन अॅन्ड रेमिटन्स (MIGRATION AND REMITTANCE) नावाचा एक अहवाल असं सांगतोय की आपल्या मुळच्या देशात पैसे पाठवण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांचा जगात क्रमाक पहिला लागतोय. याच अहवालात असं सांगण्यात आलंय की 2019 साली अनिवासी भारतीयांनी देशात 83.1 अब्ज डॉलर भारतात पाठवले आहेत. भारतानंतर चीनच्या नागरिकांचा दुसरा क्रमांक लागतोय.
आखाती देशात राहतात सर्वात जास्त अनिवासी भारतीय
भारतातून कामासाठी देशाबाहेर गेलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आखाती देशांत आहे. भारत सरकारच्या एका अहवालानुसार जवळपास 30 लाख अनिवासी भारतीय आखाती देशात काम करत आहेत. याच प्रदेशातून भारतात सर्वाधिक पैसे पाठवले जातात. त्यानंतर ब्रिटनमध्ये 10 लाख अनिवासी भारतीय तर कॅनडामध्ये अडीच लाख अनिवासी भारतीय लोक वास्तवास आहेत. आतापर्यंत जवळपास 60 देशांतील 240 अनिवासी भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.