Prashant Kishor : सध्या देशाच्या राजकारणात वेगानं घडामोडी घडत असल्याचं चित्र दिसत आहे. देशातील 10 प्रादेशिक पक्षांच्या पडद्यामागून हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा काँग्रेसच्या संपर्कात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. यावर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशांत किशोर हे काँग्रेस नेतृत्वासोबत गुजरात निवडणुकीसह अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र, मौन बाळगून आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या नेत्याने प्रशांत किशोर यांनी घेतलेल्या भेटीबाबत भाष्य करणार नसल्याचे सांगितले. याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.


नो कॉमेंट


गुजरात काँग्रेसचे प्रभारी रघु शर्मा यांना देखील प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी शर्मा यांनी  'नो कॉमेंट' असे सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, प्रशांत किशोर यांनी प्रवेश केला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सरचिटणीससारखे मोठे पद आणि पक्षाच्या प्रचार रणनितीवर पूर्ण नियंत्रण हवे होते. याबाबत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली होती. अनेक ज्येष्ठ नेते प्रशांत किशोर यांच्याकडे नियंत्रण देण्याच्या विरोधात होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.


दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसची अवस्था बिकट आहे. प्रशांत किशोर 2024 मध्ये हे प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात चक्रव्यूह करण्यात व्यस्त आहेत. भाजपच्या विरोधात सर्व पक्षांची आघाडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha