नवी दिल्ली : निवडणूक रननीतीकार प्रशांत किशोर यांनी काल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये एक बैठक झाली असून त्या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. पंजाबमध्ये सुरु असलेला काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि 2024 सालची लोकसभा निवडणूक या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांची माहिती आहे. 


जवळपास एक तासभर चाललेल्या या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याची अधिकृत माहिती काँग्रेसच्या वतीनं अद्याप देण्यात आली नाही. प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली होती. आता त्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याने या बैठकीत पंजाबच्या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 


काही महिन्यांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपल्या सल्लागारपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पंजाबमधील काँग्रेसच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. 


पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला असून नवज्योतसिंह सिद्धू विरोध कॅप्टन अमरिंदर सिंह असे दोन गट पडले होते. नवज्योतसिंह सिद्धूंनी प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती तर त्याच दिवशी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या घरी पंजाब काँग्रेसच्या नेत्यांना बोलावून 'लंच डिप्लोमसी' केली होती. 


प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवारांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर या दोघांमध्ये दिल्लीतही दोन बैठका झाल्या होत्या. त्यावेळी शरद पवार पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी करत आहेत का याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. 


काँग्रेससारख्या प्रमुख राष्ट्रीय पक्षाला अजून पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाहीय. अध्यक्षपदाचा प्रश्न इतका काळ भिजत ठेवल्यानंही काँग्रेसच्या सहकारी पक्षांमध्ये नाराजी असल्याचं सांगण्यात येतंय. लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा कालावधी असला तरी प्रमुख विरोधी पक्षांनी त्यासाठी तयारी सुरु केल्याचं दिसून येतंय. 


महत्वाच्या बातम्या :