Corona Update : देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, अद्याप धोका कमी झालेला नाही. दर दिवशी जवळपास 40 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. बुधावारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,792 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 624 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 41,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची चार लाखांहून अधिक आहे. सध्या 4 लाख 29 हजार 946 रुग्ण कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 4 लाख 11 हजार 408 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत एकूण 3 कोटी 1 लाख 4 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 9 लाख 46 हजार रुग्ण कोरोनाबाधित झाले होते.
देशातील लसीकरणाची परिस्थिती?
देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 38 कोटी 76 लाखांहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच काल दिवसभरात 37 लाख 14 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान, तमिलनाडु, बिहार, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत 18 ते 44 वयोगटातील 50 लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
राज्यात मंगळवारी 7243 नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर 10,978 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल (मंगळवारी) 7 हजार 243 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 978 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 38 हजार 734 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.21 टक्के झाले आहे.
राज्यात काल (मंगळवारी) 196 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 4 हजार 906 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 463 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 607 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
तीन जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नाही
नंदूरबार (70), हिंगोली (75), यवतमाळ (22), गोंदिया (63) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 663 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर नंदूरबार, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.
मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,950 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 925 दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :