Nitish kumar and Prashant Kishor Meeting : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यामध्ये नुकतीच एक गुप्त बैठक पार पडली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांनी शुक्रवारी दिल्लीत एकत्र जेवण केलं. परंतु, यावेळी दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळाली नाही. 


नितीश कुमार हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून ते दिल्लीत काही लोकांच्या भेटी घेत आहेत. यादरम्यानच नितीश कुमार यांनी जुने मित्र प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना नितीश कुमार यांनी सांगितले की, ही भेट काही खास नव्हती. परंतु, नितीश कुमार यांच्याशी वाद झाल्यानंतरच प्रशांत किशोर जेडीयूपासून वेगळे झाले होते. त्यामुळे या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
 
प्रशांत किशोर 2024 च्या निवडणुकांसाठी नवीन समीकरण तयार करत आहेत. त्यामुळे नितीश कुमार आणि त्यांच्या भेटीला महत्व असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. प्रशांत किशोर सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बड्या नेत्यांसोबत भेटीगाठीही सुरू आहेत. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, 2024 मध्ये भाजपचा पराभव करणे शक्य आहे. परंतु, त्यासाठी खास रणनिती आखावी लागेल.     


प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एनडीटिव्हीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले होते. "2024 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करणे शक्य आहे. परंतु, विरोधकांच्या सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपचा पराभव करणं शक्य नाही. 2024 ला भाजपला टक्कर देईल अशी विरोधी आघाडी मला तयार करायची आहे. ज्या पक्षाला भाजपचा पराभव करायचा आहे, त्यांना पुढील पाच ते दाहा वर्षांची रणनीती तयार करावी लागेल आणि ते केवळ पाच महिन्यात होणं शक्य आहे" असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते.    


महत्वाच्या बातम्या