नवी दिल्ली दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) यांचं नवं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्यात त्यांनी प्रणवदांचं राहुल गांधींबद्दल (Rahul Gandhi) काय मत होतं, त्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. शर्मिष्ठा यांनी अनेक किस्से या पुस्तकात लिहिले आहेत. एकदा प्रणवदांनी राहुल गांधींना भेटण्याची वेळ संध्याकाळची दिली होती. पण राहुल यांच्या कार्यालयानं (Rahul Gandhi Office) गडबड केली, आणि राहुल सकाळीच प्रणवदांच्या घरी प्रकटले. ज्यांना सकाळ-संध्याकाळमधला फरक कळत नाही, ते देश काय चालवणार, अशी प्रतिक्रिया तेव्हा प्रणवदांनी खासगीत दिली होती,असे शर्मिष्ठा यांनी पुस्तकात म्हटले. या पुस्तकात 'भारत जोडो यात्रे'त राहुल गांधी दाखलेली प्रतिबद्धता याचेही कौतुक करण्यात आले आहे. 


शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. या पुस्तकात म्हटले आहे की, प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींच्या काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना राहुल गांधी यांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे ते निराश झाले होते. याशिवाय, राहुल गांधींच्या कार्यालयाला एएम आणि पीएममधील अर्थ माहित नसेल, तर पीएमओ ते कसे हाताळेल, अशी टिप्पणीही प्रणव यांनी खासगीत बोलताना केली असल्याचे शर्मिष्ठा यांनी म्हटले.  'प्रणव माय फादर' या पुस्तकात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधींवरील वडिलांच्या टीकात्मक टिप्पण्या आणि गांधी कुटुंबाशी असलेल्या संबंधांबद्दल तपशीलवार लिहिले आहे.


'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार, शर्मिष्ठा पुस्तकात लिहिते की, एके दिवशी सकाळी, मुघल गार्डनमध्ये (सध्याचे अमृत उद्यान) प्रणवच्या नेहमीच्या मॉर्निंग वॉक दरम्यान राहुल गांधी त्यांना भेटायला आले. मॉर्निंग वॉक आणि पूजा करताना प्रणव यांना कोणताही व्यत्यय आवडत नसे. तरीही त्यांनी राहुल यांना भेटायचे ठरवले. खरंतर ते संध्याकाळी प्रणवला भेटणार होते, पण त्यांच्या (राहुलच्या) कार्यालयाने त्यांना चुकून सकाळची वेळ दिली होती.  मला एका एडीसीकडून घटनेची माहिती मिळाली. जेव्हा मी माझ्या वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली, "जर राहुलचे कार्यालय AM आणि PM मध्ये फरक करू शकत नाही, तर ते एक दिवस PMO कसे चालवतील?"


प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. पुढे ते देशाचे राष्ट्रपतीही झाले. यूपीएच्या कार्यकाळात मुखर्जी यांनी अर्थ आणि संरक्षण मंत्रालयासारखी महत्त्वाची पदे भूषवली. पुस्तकात त्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रणव मुखर्जी निराश झाले आणि राहुल गांधींबद्दल विचार करू लागले. "सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर जेमतेम सहा महिन्यांनी, 28 डिसेंबर 2014 रोजी पक्षाच्या 130 व्या स्थापना दिनी AICC मध्ये ध्वजारोहण समारंभात राहुल गांधी अनुपस्थित होते. त्यावर प्रणव मुखर्जी नाराज होते, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी नमूद केले. 


प्रणव मुखर्जी यांनीही या प्रकरणाबाबत त्यांच्या डायरीत लिहिले होते. त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिले आहे की, "राहुल एआयसीसीच्या कार्यक्रमात उपस्थित नव्हते. मला कारण माहित नाही पण अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यांना सर्व काही सहज मिळत असल्याने राहुल यांना काही गोष्टींचे महत्त्व माहित नाही. सोनिया गांधी या त्यांच्या मुलाला त्यांचा राजकीय वारस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, राहुल यांचा करिष्मा आणि राजकीय समजूतदारपणाचा अभाव अडचणी निर्माण करत आहे. तो काँग्रेसचे पुनरुज्जीवन करू शकेल का? तो लोकांना प्रेरणा देऊ शकेल का? मला माहीत नाही, असेही प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. 


तर प्रणव मुखर्जी यांचे मत बदलले असते...


पुस्तकात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी असेही म्हटले आहे की, जर प्रणव मुखर्जी आज हयात असते, तर त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील समर्पण, चिकाटी इत्यादींची प्रशंसा केली असती. 4,000 किमी पेक्षा जास्त लांबीच्या या 145 दिवसांच्या प्रवासामुळे राहुल हे कट्टरतावादाशी लढा देणारा नेता बनले आहेत. एक अत्यंत विश्वासू चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 


2004 च्या राजकीय घडामोडींचा उल्लेख 


2004 मधील राजकीय घडामोडींचाही  या पुस्तकात उल्लेख आहे. या वर्षी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. काँग्रेस अध्यक्षा असल्याने सोनिया गांधी पंतप्रधान होतील, अशी पूर्ण अपेक्षा होती. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य लाभले. मात्र, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला. यानंतर दावेदारांमध्ये प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. सोनिया गांधी आपल्याला पंतप्रधान करणार नाहीत हे प्रणव यांना माहीत होते. याबाबत त्यांनी आपल्या मुलीला आधीच सांगितले होते आणि तसेच घडले. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड झाली.