नवी दिल्ली: सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलच्या परीक्षेसाठी तयार केलेल्या एका हॉलतिकीटाववर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आणि फोटो सापडला आहे. असा फॉर्म कुणीतरी मुद्दाम भरल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

रामपूरमध्ये 15 जुलैला झालेल्या भरती परीक्षेसाठी हे हॉलतिकीट देण्यात आलं होते. या कार्डमध्ये नरेंद्र मोदींच्या नावासह त्यांचा फोटोही छापण्यात आला आहे. तसेच त्यावर आसन क्रमांकही देण्यात आला आहे.

 



 

या कार्डवर नाव आणि फोटो जरी मोदींचा असला तरी जन्मतारीख मात्र, 18 ऑक्टोबर 1992 अशी देण्यात आली आहे. हा फॉर्म भरणारा व्यक्ती पंजाबमधील असून तो अमृतसरजवळील समरई गावचा रहिवासी असल्याचं समजतं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सदर व्यक्तीने पंतप्रधान मोदींच्या फोटोशी खेळ करत हा फॉर्म भरला आहे.

 

15 जुलै रोजी झालेल्या परीक्षेसाठी या नंबरचा कोणताही उमेदवार आला नव्हता. मोदींच्या नावे फॉर्म भरल्याचे लक्षात येताच सदर हॉलतिकीट रद्दबातल करण्यात आले. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले असून लवकरच सदर इसमाला अटक करण्यात येईल असे स्पष्ट केले.