नवी दिल्ली: बुरहान वानी या दहशतवाद्याला चकमकीत कंठस्नान घातल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार उफाळून आला. यामुळे गेल्या 14 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान मेहबूबा मुफ्तींना अश्रू अनावर झाले होते.

 

सर्वांना सहकार्याचे आवाहन

मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. यावेळी मेहबूबांनी या नेत्यांना जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री अतिशय भावूक झाल्या होत्या.

 

बैठकीपूर्वी अनंतनागचा दौरा

या बैठकीपूर्वी मेहबूबा यांनी अनंतनागचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी त्यांनी या हिंसाचारात मारले गेलेल्या तरुणांप्रति संवेदना व्यक्त केली. या हिंसाचारात मारले गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

हिंसाचारात मारले गेलेल्या व्यक्तींच्या कुटुबीयांचीही भेट

या मुर्खतापूर्ण हिंसाचारात मारले गेलेल्या व्यक्ती अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. यावेळी त्यांनी त्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली, तसेच त्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त केली.

 

सरकार त्या सर्वांच्या पाठीशी

या मारले गेलेल्या व्यक्तींच्या अंतयात्रेत जे लोक सहभागी झाले होते, त्यापैकी कितीजणांनी त्या कुटुंबीयांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा केली. त्यांना या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. सरकार या सर्व कुटुंबीयांची स्थिती सुधारण्याच्या कामात लागली आहे.