अर्थमंत्रालयाने याबाबत अध्यादेश जारी केला असून, सध्या पोस्ट ऑफिसमधील खातेदारांना आपलं खातं आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच ज्यांना अद्याप आधार नंबर मिळालेला नाही, त्यांना आधार नंबरसाठी एखाद्या ओळख पत्रं सादर करावं लागणार आहे.
पोस्ट ऑफिसमधील खात्याशी आधार कार्ड कसं लिंक करावं?
- पोस्ट ऑफिसमधील खातं आधारशी लिंक करण्यासाठी खातेदारांना पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
- सरकारने सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
- बँक खात्यांप्रमाणे पोस्ट ऑफिस खातं आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करुन दिलेली नाही. कारण, देशातील बहुतांश पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईनची सुविधाच उपलब्ध नाही.
- याशिवाय, केंद्र सरकारनं पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग स्किम (एनएससी) आणि किसान विकास पत्र (केवीपी) साठीही आधार नंबर बंधनकारक केला आहे.
पोस्ट ऑफिसचं जाळं
सध्या देशभरात दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत. या कार्यालयांमधून पत्र पाठवणे, आणि घेण्यासोबतच पोस्ट ऑफिस खात्याचंही काम चालतं. देशाच्या ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे. लहान शहरं आणि ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्ये कॅश डिपॉझिटचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांवर याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने विविध स्किम आणि सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी, आधार नंबर मिळवण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली आहे. या पूर्वी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. आता 31 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड मिळवावे लागणार आहे.