Jagdeep Dhankhar : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना उमेदवारी देऊन भाजपने पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव खेळला आहे. धनखड 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले आहे. तेव्हापासून त्यांच्यात आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सतत संघर्ष होत आहे. दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की, ममता बॅनर्जी यांनी त्यांना ट्विटरवर ब्लॉक केले आहे.
राज्य सरकारे आणि राज्यपाल यांच्यातील वादाला मोठा इतिहास आहे, परंतु पश्चिम बंगालमधील राजकीय तज्ज्ञांच्या मते पश्चिम बंगाल सरकार आणि राज्यपाल यांच्याली वाद हा खूपच लज्जास्पद होता. राज्यातील निवडणुकीनंतरचा हिंसाचार, सभागृहात मंजूर झालेल्या विधेयकांच्या मंजुरीला होणारा विलंब, याशिवाय सभागृहाच्या कामकाजात होणारा हस्तक्षेप यासारख्या मुद्द्यांवरून सरकार आणि राज्यपालांमध्ये अनेकवेळा वाद झाले. या वादांमुळे राज्यपाल जगदीप धनकड कायमच चर्चेत राहिले.
1 एप्रिल 2021 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखर यांना फोन केला. यावेळी नंदीग्राम मतदारसंघातील अनेक मतदारांना त्यांचे मतदान करू दिले जात नाही असा आरोप करण्यात आला. "स्थानिक लोकांना मतदान करू दिले जात नाही. मी सकाळपासून प्रचार करत आहे. यामध्ये आपण लक्ष्य घालावे असे आवाहन करत अससल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.
"पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा, बांकुरा, पश्चिम मेदिनीपूर आणि पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यांतील 30 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असताना बॅनर्जी यांनी स्थानिकांना मतदान करू देत नसल्याचा आरोप केला होता. ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीनंतर राज्यपालांनी ट्विट करून राज्यात कायद्याचे राज्य पालण केले जाईल, असे आश्वासन दिले होते.
कुलगुरूंच्या नियुक्तीवरून वाद
पश्चिम बंगालमध्ये विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री कुलपती असणार या निर्णयानंतर राज्यात वाद सुरू झाला. कोलकाता आणि जादवपूरसह राज्यातील 24 विद्यापीठांच्या कुलगुरूंची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप धनखड यांनी ट्विटरवरून केला होता. त्यांनी ट्विट करून त्या विद्यापीठांची यादीही प्रसिद्ध केली होती.
ममता बॅनर्जींकडून धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक
31 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केले. ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल धनखड यांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लॉक केल्यानंतर एका दिवसानंतर त्यांनी म्हटले की, राज्य हे लोकशाहीसाठी गॅस चेंबर बनले आहे.
प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार
17 फेब्रुवारी 2022 रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विनंती केली की त्यांनी विविध मुद्द्यांवर मागितलेली माहिती लवकरात लवकर द्यावी. धनखड यांचे तृणमूल सरकारशी मतभेद आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी बॅनर्जी यांना आठवड्यात राजभवनात भेट देण्याचे आणि "संवैधानिक गतिरोध" टाळण्यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आवाहन केले होते.
हिंसा आणि अराजकतेचे वक्तव्य
22 मार्च 2022 रोजी बीरभूममध्ये 8 जणांना जिवंत जाळल्यानंतर जगदीप धनखड यांनी या गोष्टीचा निषेध करत राज्य "हिंसा आणि अराजकतेत" अडकल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धनखड यांचे हे वक्तव्य दुर्देवी असल्याचे म्हटले होते. राज्य सरकारला धमकावण्यासाठी इतर राजकीय पक्षांना समर्थन देण्यासाठी "राजकीय रंग" आणत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. याबाबत त्यांनी धनखड यांना पत्र देखील लिहिले होते. "प्रतिष्ठित घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीसाठी त्यांची टिप्पणी अत्यंत दुर्दैवी आणि अशोभनीय आहे, असे या पत्रात म्हटले होते.
भाजपविरोधात जिहाद दिनाच्या वक्तव्यावरून वाद
30 जून 2022 रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेस 21 जुलै हा दिवस "भाजपविरुद्ध जिहादचा दिवस" म्हणून पाळणार असल्याची कथित टिप्पणी मागे घेण्यास सांगितले होते.
कुलपती बदलण्यावरून वाद
01 जुलै 2022 रोजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी राज्य संचालित रवींद्र भारती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीवरून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारसोबत नवीन संघर्ष सुरू केला. राज्यपालांनी जाहीर केले होते की त्यांनी प्राध्यापिका महुआ मुखर्जी यांची आरबीयूच्या नृत्य विभागातील पुढील कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे.
कुलपती विधेयक मंजूर
3 जुलै 2022 रोजी पश्चिम जगदीप धनखड यांनी "अनुपालनाची अपूर्णता" या कारणास्तव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्य विद्यापीठांच्या कुलपती बनवणारे विधेयक परत केले. राज्यपालांच्या जागी मुख्यमंत्र्यांची कुलपती म्हणून नियुक्ती करण्याचे विधेयक14 जून रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आले.
सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप
पश्चिम बंगालचे राज्यपाल धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद आणखी वाढला. ममता बॅनर्जी यांनी भाजप शासित असलेल्या राज्यांच्या राज्यपालांनी "सत्तेचा गैरवापर" केल्याचा आरोप केला. जुलै 2019 मध्ये राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून धनखड यांनी बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विविध मुद्द्यांवरून नियमितपणे लक्ष्य केले.