Porn Racket Case : गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्या मोबाईल अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्यावर्षी राज कुंद्राला अटक केली होती. यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं. या व्यवहारांचा आता ईडीकडून तपास केला जाणार आहे..


अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी मुंबईत चर्चेचा विषय ठरलेल्या पॉर्न रॅकेट प्रकरणात आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा तपास सुरू करण्यात आला आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितलं की, ईडीने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी सुरू केली आहे. 


2021 मध्ये राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलनं अटक केली होती. राज कुंद्रावर आरोप आहेत की, फेब्रुवारी 2019 मध्ये कुंद्रानं आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि हॉटशॉट्स नावाचं अॅप विकसित केलं. हे हॉटशॉट्स अॅप राज कुंद्रानं यूके स्थित फर्म केनरिनला 25 हजार डॉलरमध्ये विकलं होतं. या कंपनीचं सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे मेहुणे आहेत. 


ईडीकडून राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल


राज कुंद्रानं हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी केनरिन नावाच्या कंपनीनं कुंद्राच्या कंपनी विहानशी करार केला होता आणि त्याच देखभालीसाठी विहान कंपनीच्या बँक खात्यात पैशांचा व्यवहार झाल्याचंही तपासात उघड झालं आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे अॅप्लिकेशन पॉर्न कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. या अर्जामागे राज कुंद्राचा हात होता आणि त्यानं आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता. 


काय आहे प्रकरण? 


राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पॉर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये 'आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड' नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला आहे.