Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. या दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या टी-शर्टवरून भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये राजकीय खडाजंगी झाली. 'भारत जोडो यात्रे'दरम्यान शुक्रवारी महागाईचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी 41,257 रुपयांचा टी-शर्ट घातला होता, असा दावा करत भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपने राहुल गांधींच्या फोटोसह ट्विटही केले-
राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद, भाजप-कॉंग्रेसमध्ये खडाजंगी
राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. बेरोजगारी, महागाई, गरिबी या मुद्द्यांवरून काँग्रेस सातत्याने भाजपला घेरते आहे, तर या भेटीतून जनतेचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा कॉंग्रेसचा हेतू आहे. तर भाजपही या यात्रेवर खास लक्ष ठेवून आहे. भारतीय जनता पक्षाने काल काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर निशाणा साधत एक ट्विट केले होते. ज्यात म्हटंलय..
41 हजाराचा टी-शर्ट- भाजप
भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. यासोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्या टी-शर्टची किंमत आणि ब्रँड लिहिलेला आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींनी 41 हजार रुपये किमतीचा टी-शर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करत भाजपने लिहिले, 'भारत बघा' असं म्हटलंय. तर काँग्रेसनेही यावर प्रत्युत्तर दिलंय.
काँग्रेसचे प्रत्युत्तर
भाजपच्या या ट्विटनंतर काँग्रेसने प्रत्युत्तर देत म्हटलं, केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप सध्या भारत जोडो यात्रेबाबत लोकांच्या प्रतिक्रियांमुळे घाबरला आहे. काँग्रेस म्हणाली, भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून 'अरे... तुम्ही घाबरलात का? बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल. सांगा काय करायचं ते?
दररोज 22 ते 23 किमी पदयात्रा
काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिवसभरात सरासरी 22 ते 23 किलोमीटर असणार आहे. हा प्रवास दररोज सकाळी 7 वाजता सुरू होणार असून सकाळी 10 वाजेपर्यंत चालणार आहे. यानंतर काही तासांच्या विश्रांतीनंतर हा प्रवास दिवसाच्या उत्तरार्धात दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, जो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेला 3570 किमी लांबीचा हा प्रवास पाच महिने चालणार आहे. तसेच 12 राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, "ही भारत जोडो यात्रा अनेक अर्थाने पक्षासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्हाला लोकांशी जोडण्याची संधी मिळेल, त्यांचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळेल आणि आमचे ध्येय आहे की आम्ही लोकांच्या जवळ जाऊ.