नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करुन पळून गेलेल्या मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या कर्जबुडवा मेहुल चोक्सी डॉमिनिकाच्या ताब्यात आहे. डॉमिनिका सरकारला भारताने मेहुल चोक्सी याच्याविरोधात सर्व पुरावे दिले असून ते डॉमिनिकाच्या स्थानिक कोर्टमध्ये सादर करण्यात येणार आहेत. 


भारत आणि डॉमिनिकामध्ये थेट प्रत्यार्पणाचा करार नाही, तो अँटिगासोबत आहे. त्यामुळे डॉमिनिका कोर्टाचा निर्णय महत्वाचा असणार आहे. डॉमिनिका कोर्ट आता मेहुल चोक्सीला भारताच्या हवाली करायचं की परत अँटिगाला पाठवायचं याचा निर्णय घेणार आहे. मेहुल चोक्सी हा अँटिगावरुन क्युबाला पळून जात होता त्यावेळी त्याला डॉमिनिकामध्ये अवैधरित्या प्रवास केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली आहे. 


मेहुल चोक्सी सध्या डोमिनिकामध्ये अटकेत आहे. त्याचा अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो हाती लागला आहे. चोक्सीचा हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलं आहे. पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता.


भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सी वास्तव्याला होता. याच बेटावरील डॉमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 62 वर्षीय फरार मेहुल चोक्सी ॲंटिग्वाच्या नागरिकत्वाच्या आधारे 2017 पासून तिथे लपून बसला होता. आता त्याचं भारताकडे सोपवण्याची तयारी ॲंटिग्वा सरकारने केली.


आपल्यावरील आरोप खोटे, निराधार आणि राजकीय प्रयत्नांमुळे प्रेरित आहेत, चोक्सीने याआधी म्हटलं होतं. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीला अटक केली आहे. काकाप्रमाणेच नीरव मोदीनेही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता आणि सध्या तो युनायटेड किंग्डममध्ये आहे. नीरव मोदी अद्यापही या प्रत्यार्पणाच्या आदेशाला यूके उच्च न्यायालयासमोर आव्हान देऊ शकतो. त्यामुळे पुतण्याच्या आधी काका चोक्सीला भारतात आणलं तर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेलमध्ये राहणार हे निश्चित.


महत्वाच्या बातम्या :