Modi Govt 2.0 : मोदी सरकार सत्तेची सात वर्षे पूर्ण करत असताना काँग्रेस मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. राज्यातील काँग्रेस नेते मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत. इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारीसह विविध मुद्यांवरुन काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. 


मोदी सरकारला आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. तर एकूण कार्यकाळातील सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याचाच निषेध म्हणून काँग्रेस आज मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे मोदी सरकारविरोधात मुंबईत आंदोलन करणार आहेत. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार अमरावतीत, कोल्हापुरात सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण पुण्यात तर नाशकात बाळासाहेब थोरातही मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. त्याचप्रमाणे हे सर्व नेते मोदी सरकारविरोधात पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीतही 10 वाजता काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जाणार आहे. 


मोदी सरकार 2.0 ला दोन वर्षे पूर्ण; जल्लोष नको, लोकांची मदत करा, पक्षाचा लोकप्रतिनिधींनी आदेश


मोदी सरकार सत्तेत येऊन आज सात वर्षे पूर्ण झालीत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये सांगण्यात आलंय की, आज कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करु नये वा कोणत्याही प्रकारचा उत्सव स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करु नये. त्या ऐवजी कल्याणकारी कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि कोरोना प्रभावित लोकांची मदत करावी. 


मोदी सरकार 2.0 ने दोन वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने भाजपच्या प्रत्येक खासदार आणि आमदारावर एक जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक खासदार आणि आमदाराने दोन गावांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना मदत करावी असा आदेश देण्यात आला आहे. केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजप कार्यकर्ते ग्रामीण भागात मास्क, सॅनिटायझर आणि अन्न धान्य तसेच इतर आवश्यक साहित्यांचं वाटप करणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांनीही दोन गावांपर्यंत पोहोचावं, जर त्यांना ते शक्य झालं नाही तर किमान व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तरी त्यांनी त्या गावांशी संवाद साधावा असा आदेश पक्षाच्या हायकमांडकडून देण्यात आला आहे. 


दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला दोन वर्ष आणि मोदी सरकारच्या देशातील सत्तेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं आम्ही देशातल्या जनतेचं सरकारच्या कामाबाबत मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. देशात 1 जानेवारीपासून 28 मेपर्यंत एबीपी आणि सीव्होटरनं सर्व्हे केला. यामध्ये 32 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामावर समाधान व्यक्त केलं. तर कोरोना काळातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या कामावर 61 टक्के जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :