नवी दिल्ली : 2021 कोटी रुपये... हा आकडा कुठल्या कल्याणकारी योजनेवर झालेल्या खर्चाचा नाही... तर हा आहे पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाचा सरकारी आकडा. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयानेच ही आकडेवारी दिली आहे.
चार्टर्ड विमान प्रवास भाडं, विमानाचा देखभाल खर्च आणि हॉटलाईन फोन सुविधा या तीन बाबींअंतर्गतचा खर्च यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यातही हॉटलाईन फोनच्या बिलाचे आकडे हे दोन वर्ष आधीचे आहेत.
मोदींच्या तुलनेत मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात मात्र परदेश दौऱ्यांसाठी सरकारी तिजोरीवर कमी भार पडल्याचं चित्र दिसतं. सत्तेत आल्यापासून आतापर्यंत मोदींनी 48 परदेश दौऱ्यांमधे 55 देशांना भेटी दिल्या, तर 2009 ते 2014 या यूपीए 2 च्या काळात मनमोहन सिंह यांनी 38 परदेश दौऱ्यांमधे 33 देशांना भेटी दिल्या होत्या.
मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च 2021 कोटींहून अधिक आहे. तर मनमोहन सिंह यांच्या काळात हा खर्च 1346 कोटी रुपये होता. म्हणजे मोदींच्या कार्यकाळात परदेश दौऱ्यांवर झालेला खर्च मागच्या सरकारच्या तुलनेत 800 कोटींनी अधिक आहे.
काँग्रेस खासदार संजय सिंह यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी ही माहिती दिली. ज्या ज्या देशांना मोदींनी भेटी दिल्यात, तिथून भारतात नेमकी किती गुंतवणूक आली हे या खासदारांना जाणून घ्यायचं होतं. अर्थात पंतप्रधानांची भेट आणि आलेली गुंतवणूक यांचा थेट संबंध काढणं तितकंसं बरोबर नाही, कारण त्यात इतरही घटक कारणीभूत असतात. 2014 नंतर ज्या देशांना मोदींनी भेट दिली, त्यातल्या अनेक देशांतून सर्वाधिक परकीय गुंतवणूक आल्याचं सरकारनं या उत्तरात म्हटलं आहे.
संजय सिंह यांचा दुसरा प्रश्न होता, या प्रत्येक दौऱ्यात किती सरकारी-बिगरसरकारी व्यक्ती पंतप्रधानांच्या सोबत होत्या, त्यांच्यावर झालेल्या खर्चाचा तपशील द्या. मनमोहन सिंह आणि मोदी या दोघांच्या कार्यकाळातली ही तुलनात्मक माहिती प्रश्नात विचारण्यात आली होती. पण या प्रश्नाचं उत्तर सरकारनं टाळलं. ही माहिती संवेदनशील असल्यानं ती जाहीर करता येत नाही असं उत्तरात म्हटलं आहे.
सत्तेत आल्यापासून मोदींचे परदेश दौरे हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले आहेत. जगाची विभागणी मोदींनी भेट दिलेले देश आणि न भेट दिलेले देश अशीही काहींनी करुन टाकलीय. या परदेश दौऱ्यांमधून काही ठोस हाती लागलं, का याचं उत्तर भविष्यात मिळेलच.
आपण आपले सगळे शेजारी राष्ट्र आपण दुखावून ठेवलेत. पाकिस्तानची गळाभेट घेऊन संबंध सुधारतील या आशेनं कधी नव्हे इतकं गोंधळाचं धोरण राबवलं गेलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक वर्षातल्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे येणार होते, पण त्यांनीही नकार कळवला. आता निवडणूक वर्षात मोदींनी आपल्या परेदश दौऱ्यांना पूर्ण ब्रेक दिला आहे. पुढच्या चार महिन्यांत ते एकही परदेश दौरा न करता निवडणूकीवरच लक्ष केंद्रित करणार आहेत.