मागील 31 मेच्या मन की बातमध्ये मोदींनी मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना तसेच स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीनं काम सुरू झालं असल्याचं सांगितलं होतं. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, असंही पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्या दृष्टीनं कामाची सुरुवात देखील झाली आहे.
नाशिकच्या राजेंद्र जाधवांचा मोदींकडून उल्लेख
आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्याचा उल्लेख केला होता. नाशिकच्या सटाणा येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरच्या मदतीनं सॅनिटायझेशन मशीनची निर्मिती केली आहे. आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी स्व खर्चातून सॅनिटायझेशन मशीन बनवली आहे. याबाबत मोदी यांनी जाधव यांचं कौतुक केलं होतं. भारतात कोरोनाविरोधात सर्वजण प्रयत्न करत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात लोक स्वतःला सेवेत वाहून घेत आहेत. जे या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. त्यांना कसलाही दुसरा विचार सतावत नाही. वेळेमुळे अनेक संस्था, व्यक्ती आणि सेवा करणाऱ्यांची नाव घेऊ शकत नाही, असं मोदी म्हणाले होते.
26 एप्रिलच्या मन की बातमध्ये मोदी यांनी संकटाच्या काळात भारतानं जगाला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं असल्याचं म्हटलं होतं. संपूर्ण जग कोरोनाविरोधात एकवटलं आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेनं याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल. लॉकडाऊनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाऊच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीनं लढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. कोरोनाच्या काळात सगळेचं झोकून देऊन काम करत आहेत. देशवासियांच्या या भावनेला मी नमन करतो, असं मोदींनी म्हटलं होतं.
2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 66 वी मन की बात आहे.