नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे उच्चांक गाठत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी वर्च्युअल माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन काही उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत. पीएमओ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9 वाजता कोविड-19 मुद्द्यावरुन मोदी आणखी एक बैठक घेणार आहेत. तसेच दहा वाजता ते कोरोनासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 


कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निवारण पंतप्रधान करणार आहेत. तसेच दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नोदी देशातील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात एक बैठक घेणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील प्रमुख ऑक्सिजन निर्मात्यांसोबत वर्च्युअल बैठक घेणार आहेत. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तसेच दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन लाखांहून अधिक दैनंदिन वाढ होत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सलग तीन महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. 


गुरुवारी देशात 3 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद 


भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी केवळ 24 तासांत 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 178,841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसांत सर्वाधिक तीन लाख सात हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :