नवी दिल्ली : येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सर्वांना 28 एप्रिलपासून आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. ही नोंद केंद्र सरकारच्या कोविन अॅप आणि cowin.gov.in या वेबसाईटवर करता येणार आहे. 


 






देशात 1 मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार असून त्यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


आता राज्यांना थेट कंपन्यांकडून कोरोनाची लस खरेदी करण्याची मूभा केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार आता राज्य सरकार खुल्या बाजारातून लस खरेदी करू शकतात. 


महाराष्ट्रात व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्यात एक ऑनलाईन बैठक पार पडली. त्यामध्ये राज्यातील 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण कशा पद्धतीने करण्यात येऊ शकेल यावर चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास 8.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 178,841 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसांत सर्वाधिक तीन लाख सात हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 
 


महत्वाच्या बातम्या :