PM Narendra Modi Announced Vishwakarma Yojana: देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावरून (Lal Qila) तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Narendra Modi) आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबांपर्यंत पोहोचलेल्या सर्व योजनांचा आवर्जुन उल्लेख केला. तसेच, ऐतिहासिक लाल किल्‍ल्‍याच्‍या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशवासियांना गृहनिर्माण योजना ते स्‍वानिधी योजनेच्‍या यशाबद्दल सांगितलं. यासोबतच पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आज एका नव्या योजनेची घोषणाही केली. विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांना नवीन योजना सुरू करण्याची घोषणा लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणामध्ये केली.


नव्या योजनेचा कोणाला फायदा? 


लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी 'विश्वकर्मा योजना' (Vishvakarma Yojana) सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करेल, असंही यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी आणि चर्मकार या पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून त्यांना त्यांचा व्यावसाय वाढवण्यासाठी मदत केली जाईल.


पुढील महिन्यात विश्वकर्मा योजना होणार लॉन्च 


लाल किल्‍ल्‍याच्‍या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींनी पुढील महिन्‍यात पारंपारिक कौशल्य असल्‍या लोकांसाठी विश्‍वकर्मा योजना सुरू करण्‍याची घोषणा केली. विश्वकर्मा योजनेत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आम्ही 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. 


8 कोटी लोकांनी सुरू केला व्यवसाय


पीएम मोदी म्हणाले की, मुद्रा योजनेतून तरुणांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतून आठ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येक व्यवसायानं 1-2 लोकांना रोजगार दिला आहे.


जगभरातील तरुणांना वाटतंय आश्चर्य : पंतप्रधान मोदी 


देशाच्या युवा शक्तीवर माझा विश्वास आहे, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. युवाशक्तीमध्ये क्षमता आहे आणि त्याच युवाशक्तीला अधिक बळ देण्याचं आमचं धोरण आहे. आपल्या देशातील तरुणांनी भारताला जगातील पहिल्या 3 स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवून दिलं आहे. आज जगभरातील तरुण भारताची ही क्षमता पाहून आश्चर्यचकित झाले आहेत, असंही मोदी म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


PM Modi : मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी