नवी दिल्ली : भारतमातेला पारतंत्र्याच्या बेडीतून अनेक शूर पुत्रांनी इंग्रज राजवटीविरोधात लढा देत आपल्या प्राणाची आहुती दिली होती. याच बलिदानाच्या जोरावर 14 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. पुन्हा एकदा या हुतात्म्यांना स्मरण करण्याचा पवित्र सण म्हणजेच स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या रंगात रंगला आहे. 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2023) सोहळ्याची दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर (Red Fort) तयारीही पूर्ण झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.


लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक-


सकाळी 6.55 - संरक्षण सचिव पोहोचतील
सकाळी 6.56 ते 7 - सीडीएस आणि तिन्ही सेना प्रमुखांचे आगमन होईल
सकाळी 7.06 - पंतप्रधान राजघाटावर पोहोचतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करतील.
सकाळी 7.08 - संरक्षण राज्यमंत्री येतील
सकाळी 7.11 - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येणार
सकाळी 7.18 - पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन आणि त्यानंतर पंतप्रधानांना तिन्ही दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल
सकाळी 7.30 - पंतप्रधान ध्वजारोहण करतील, रक्षक नॅशनल सॅल्यूट देतील, बँडवर राष्ट्रगीत वाजवंल जाई, त्यानंतर 21 तोफांची सलामी
सकाळी 7.33 - पंतप्रधानांचे देशाला संबोधन


लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींचे सलग दहावं भाषण


लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लाल किल्ल्यावरुन हे त्यांचं शेवटचं भाषण असेल. लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने पंतप्रधानांचे स्वागत करतील. पंतप्रधानांच्या गार्ड ऑफ ऑनर तुकडीत लष्कर, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांचे प्रत्येकी एक अधिकारी आणि प्रत्येकी 25 कर्मचारी आणि नौदलातील एक अधिकारी आणि 24 कर्मचारी असतील.


लाल किल्ल्यासमोरील ज्ञानपथ फुलांनी सजवला 


लाल किल्ल्यासमोरील ज्ञानपथ फुलांनी सजवला जाईल आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त G-20 चे फलक लावले जातील. पंतप्रधान मोदी जिथून देशाला संबोधित करतात त्या किल्ल्याच्या तटबंदीवर कोणतीही मोठी सजावट केलेली नाही. सरकारने देशभरातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थींसह सुमारे 1,800 विशेष पाहुण्यांना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं आहे.


यामध्ये सरपंच, शेतकरी उत्पादक संस्था योजनेशी संबंधित लोक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सहभागी, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, नवीन संसद भवनासह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील बांधकाम कामगारांचा समावेश आहे. याशिवाय खादी कामगार, सीमावर्ती रस्त्यांचे बांधकाम, अमृत सरोवर, हर घर जल योजनेशी संबंधित लोक, प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमार हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील.


देश अमर काळात प्रवेश करेल


आज, स्वातंत्र्यदिनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न होईल आणि 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी देश नव्या उमेदीने अमृत पर्वात प्रवेश करेल. पंतप्रधानांनी 12 मार्च 2021 रोजी गुजरातमधील अहमदाबाद इथल्या साबरमती आश्रमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली होती.


लाल किल्ल्याभोवती 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात


देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरसुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लाल किल्ल्याभोवती 10,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच 1000 कॅमेरे, ड्रोनविरोधी यंत्रणाही बसवण्यात आली आहे.


हेही वाचा


Mile Sur Mera Tumhara : दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गाणे कसे तयार झाले? वाचा 'मिले सूर मेरा तुम्हारा' गीताच्या निर्मितीची भन्नाट कथा