नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवरुन (Operation sindoor) जोरदार चर्चा सुरू असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धडाकेबाज भाषण केल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनीही सत्ताधाऱ्यांना भारतीय सैन्य आणि पहलगाम हल्ल्यावरुन अनेक सवाल केले. त्यानंतर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही थेट ऑपरेशन सिंदूर का थांबवलं, कोणाच्या सांगण्यावरुन सांगितलं, हिंमत असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेऊन मोदींनी लोकसभेत माहिती द्यावी, असे आव्हानच दिले होते. राहुल गांधींच्या (Rahul gandhi) भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तान, पहलगाम हल्ला आणि भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईची माहिती सभागृहात दिली. तसेच, ऑपरेशन सिंदूर थांबविण्यासाठी कुठल्याही नेत्याने मध्यस्थी केली नसल्याचे सांगत राहुल गांधींवर पलटवार केला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परस्थिती निर्माण झाली होती, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर मिसाईल हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील सीमारेषांवर तणावाचे वातवारण होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण दोन्ही देशांतील युद्ध थांबवल्याचे सांगत शस्त्रसंधी जाहीर केल्याची माहिती दिली होती. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्या ट्रम्प यांनी मध्यस्ती केल्याच्या चर्चा जगभरात झाल्या. अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर राहुल गांधंनी थेट पंतप्रधानांना आव्हान देत स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर, नरेंद्र मोदींनी माहिती देत राहुल गांधींवर पलटवार केला.
पाकिस्तानावर आमचा हल्ला निश्चित होता, आमचे ध्येय निश्चित होते, भारताने ते लक्ष्य पूर्ण केलं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं. त्यासाठी, जगातल्या कोणत्याही नेत्याने हा हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली नाही हे मी जबाबदारीने सांगतोय, असे मोदींनी लोकसभेत बोलताना म्हटले. तसेच, 9 मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सातत्याने मला फोन करत होते. तीन-चार वेळा फोन केल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, असं जर झालं तर पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत त्यापेक्षाही मोठा हल्ला करेल. आम्ही गोळीला उत्तर गोळीने देणार, अशी माहिती मोदींनी सभागृहात दिली. त्यावेळी, उपस्थित सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवत मोदी मोदी.. अशी घोषणाबाजी केली.