नवी दिल्ली : कोरोना काळात नव्या वर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत केलं जात आहे. अनेक ठिकाणी अटी-शर्थींसह नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा देत ट्वीट केलं आहे की, "तुम्हाला 2021 च्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धि घेऊन येवो. अपेक्षा आणि कल्याण होण्याची भावना प्रबळ होत जावो."
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी कोरोना महामारीमध्ये या कठिण वेळी एकजुटीने पुढे जाण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रपती म्हणाले की, "नव्या वर्षाच्या निमित्ताने, भारत आणि विदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा."
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू म्हणाले की, "आपण 2021 चं नवा उत्साह आणि सकारात्मकतेसोबत स्वागत करुया. उपराष्ट्रपती म्हणाले की, "आपण आशा करुयात की, आपण धैर्य, आत्मविश्वास आणि एकात्मकतेसोबत आव्हानांचा सामना करुयात. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्तम आरोग्य, आनंद आणि सामंजस्याने जगात 2021 ची सुरुवात करुयात. मी सर्व नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो."
राजनाथ सिंह, राहुल गांधीनीही दिल्या शुभेच्छा!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच नेत्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्यात सुख, समृद्धि, शांति आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, या माझ्या सदिच्छा."
राहुल गांधी यांनीही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, "नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण त्या लोकांना आठवूयात ज्यांना आपण गेल्या वर्षभरात गमावलं आणि त्या सर्वांचे आभार मानूयात, ज्यांनी या संकटाच्या काळात आपल्या सर्वांचं रक्षण केलं. तसेच वेळीच आपल्यासाठी बलिदान दिलं. मी शेतकरी आणि मजुरांच्या अन्याय आणि सन्मानाच्या लढाईत त्यांच्यासोबत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा."