नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर CBSE Exams Date 2021 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, आता त्यांना अभ्यासाच्या वेळांची आखणी करता येणार आहे. शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे ते 10 जून 2021 या कालावधीत पार पडणार आहेत.


यावेळी त्यांनी प्रॅक्टिकल परीक्षा आणि निकालांची तारीखही जाहीर केली. 1 मार्च 2021 पासून प्रॅक्टिकलला सुरुवात होणार आहे. तर, निकाल 15 जुलै 2021 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं या तारखा जाहीर होणं सोयीचं मानलं जात आहे. ज्यामुळं आता हाताशी उरलेल्या वेळाचा ते पूर्ण उपयोग करत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकणार आहेत.


भारत सरकारकडून कोरोना लसीला मान्यता मिळण्याची शक्यता, तीन कंपन्या शर्यतीत


परीक्षांसाठी अभ्यासाचे बेत आखतेवेळी विद्यार्थ्यांनी जमेच्या बाजूसोबतच आपल्या कमतरताही लक्षात घ्याव्यात. सहसा प्रत्येक विद्यार्थी आपल्या परीनं परीक्षांची तयारी करत असतो. पण, परीक्षेपूर्वी सराव प्रश्नपत्रिका सोडवणं कधीही फायद्याचं. याच धर्तीवर सीबीएसईनं काही दिवसांपूर्वीच अशाच पेपरचे काही नमुने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळार पोस्ट केले आहेत. जिथं ते डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. हे पेपर डाऊनलोड करण्यासाठी cbseacademics.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.


मागील वर्षी कोरोना महामारीमुळं सर्वच क्षेत्रांवर याचे परिणाम दिसून आले. शैक्षणिक विभागाला याचा मोठा फटका बसला. कोरोनाच्या संकटामुळं अनेक शाळा आणि महाविद्यालयं बंदच राहिली. ऑनलाईन पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्र कार्यरत राहिलं खरं. पण, तरीही सातत्यानं परीक्षांच्या तारखा बदलणं, शैक्षणिक वर्षात काही अडथळे निर्माण होणं याचाच सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. त्यामुळं किमान परीक्षांच्या तारखांची अधिकृत घोषणा होणं हा विद्यार्थ्यांसाठी एक दिलासाच आहे, असं म्हणायला हरकत नाही.